बायोपिकमधून उलगडणार मदर तेरेसांचा जीवनप्रवास

mother-teresa
बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला बायोपिक चित्रपटांची खूपच चलती आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये, कारण हे चित्रपट तिकीटबारीवर बक्कळ कमाई करत असल्याचे त्यांच्या कमाईंच्या आकड्यांवरुन स्पष्ट झाले आहे. आता पर्यंत आपण खेळाडू, राजकीय नेते तसेच बॉलीवूड कलाकारांवर आधारित बायोपिक पाहिले आहेत. पण आता तुम्हाला एका समाजसेविकेचा जीवनप्रवास बायोपिकच्या माध्यमातून पाहता येणार आहे. कारण नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सीमा उपाध्यय करणार असून बॉलिवूड तसेच हॉलिवूड स्टार या चित्रपटात झळकणार आहेत. प्रदीप शर्मा, नितीन मनमोहन, गिरीश जोहर आणि प्राची मनमोहन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

मदर तेरेसा यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सध्याच्या मिशनरी ऑफ चॅरिटी सुपीरियर जनरलच्या सिस्टर प्रीमा मेरी पियिक यांची भेट घेतली. तसेच चित्रपटाच्या यशासाठी कोलकात्ता येथील सिस्टर लीन यांनी शुभेच्छाही दिल्या. कोलकातामधील मिशनरी ऑफ चॅरिटीला आम्ही भेट दिली आणि तो अनुभव आमच्यासाठी खास असल्याचे उपाध्यय यांनी म्हटले. मदर तेरेसा यांच्या सेवाभावी कार्यावर चित्रपट बनवताना निर्मात्यांना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २०२०मध्ये ‘मदर तेरेसा: द संत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच मदर तेरेसा यांनी केलेल्या कामाचे अनेक पैलू या चित्रपटाव्दारे लोकांसमोर उघड होणार आहेत.

Leave a Comment