
मुंबई – आता दिव्यांग आणि त्यांच्या साथीदारास एसटी महामंडळाच्या वातानुकुलित शिवशाही बसेसमध्ये प्रवासभाडे सवलत देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यासंबंधीची घोषणा केली.
दिव्यांग प्रवाशांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मिळणार सवलत
आता दिव्यांग व्यक्तीस शिवशाही बसच्या प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के एवढी सवलत देण्यात येणार आहे. अंध आणि अपंगांना महामंडळामार्फत सध्या साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या व निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. या प्रवास भाडे सवलत योजनेत आता वातानुकुलित शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या अंध आणि अपंगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे सध्या राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार लाभार्थी आहेत. त्यांनाही शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे रावते यांनी सांगितले.
