जाणून घेऊ या पिझ्झाविषयी काही रोचक तथ्य

pizza
मूळचा इटालियन असलेला पिझ्झा हा पदार्थ आता भारतामध्ये अगदी गावोगावी सहज उपलब्ध असणारा, आणि घरच्या घरी देखील तयार करता येणारा पदार्थ बनला आहे. त्याचबरोबर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीची दाद मिळवून जाणारा हा पदार्थ असल्यामुळे ‘पिझ्झा’ परदेशी पाहुणा असूनही, आता आपल्या आधुनिक खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग बनलेला आहे. पण पिझ्झाचा आस्वाद घेतानाच हा पदार्थ नेमका अस्तित्वात आला कसा, आणि अस्तित्वात आला तेव्हा याचे रूप कसे होते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? या निमित्ताने या पदार्थाविषयीची काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.
pizza1
पिझ्झाचा इतिहास फार प्राचीन काळापासूनचा आहे. हा पदार्थ सुरुवातीला इजिप्शियन आणि त्यानंतर इटालियन खाद्यसंस्कृतीमध्ये पहावयास मिळत असे. त्याकाळी केवळ एखाद्या पोळी किंवा भाकरीप्रमाणे याचा बेस तयार करून यावर निरनिराळे पदार्थ घालून हा पिझ्झा शिजविला जात असे. ९९७ सालापासून इटलीमध्ये हा पदार्थ बनविला जात असल्याचा उल्लेख सापडतो. त्याकाळी, पोळीप्रमाणे दिसणाऱ्या बेसवर तेल, काही मसाले, कोथिंबीर, बेसिल किंवा तत्सम पाने, आणि चीझ घालून हा पदार्थ तयार केला जात असे. पिझ्झा बनविताना त्यामध्ये टोमॅटोचा वापर करण्याची पद्धत अठराव्या शतकापासून सुरु झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पिझ्झा बनविताना निरनिराळे पदार्थ त्यावर घालून पिझ्झा तयार करण्याचे प्रयोग सुरु झाले.
pizza2
काळ बदलत गेला, तसे पिझ्झाचे रूपही बदलले. पण आजच्या काळामध्ये देखील थेट पहिल्यासारख्या चवीचा पिझ्झा इटलीमध्ये सहज उपलब्ध असतो. भारतामध्ये आपल्याला मिळत असणारा पिझ्झा, इटलीमधील पारंपारिक ‘पिझ्झेरिया’मध्ये उपलब्ध असणाऱ्या पिझ्झापेक्षा खूपच वेगळा आहे. पारंपारिक इटालियन पिझ्झेरियामधे मिळणाऱ्या पिझ्झांमध्ये ‘पिझ्झा मारिनारा’ आणि ‘पिझ्झा मार्घरिटा’ हे दोन प्रकार पिझ्झाच्या मूळ रेसिपीजवर आधारित असून अतिशय लोकप्रिय आहेत. ‘पिझ्झा कॅप्रिकीओसा’ आणि ‘क्वात्रो स्तेजिओनि’ हे दोन आणखी अतिशय लोकप्रिय प्रकार पारंपारिक पिझ्झेरियामध्ये पहावयास मिळतात.
pizza3
आधुनिक काळामध्ये पिझ्झाचे रूप खूपच बदलले आहे. आताच्या काळामध्ये पिझ्झावर असणारे टोमॅटो, अननस, ‘स्टेक्स’, पिझ्झा सॉस आणि क्वचित मेयोनीज हे पदार्थ पारंपारिक पिझ्झामध्ये कधीच समाविष्ट केले गेले नव्हते. आताच्या बदलत्या काळामध्ये पिझ्झा जसा इटलीमधून निघून सर्वदूर जाऊन पोहोचला, तसतशा त्या त्या ठिकाणच्या खाद्य परंपरेच्या अनुसार त्यामध्ये बदल घडून आले. आताच्या काळामध्ये पिझ्झाचे मूळ रूप बदलले आणि अर्थातच चवही बदलली. पण या पदार्थाने सर्वांना आपलेसे केले आहे, हे मात्र नक्की.

Leave a Comment