
सुमन बोडानी पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश
सुमन पवन बोडानी यांना पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे. पाकिस्तानातील शमा टेलीव्हिजन या वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बोडानी या सिंध प्रांतातील शाहदादकोट येथील राहणाऱ्या आहेत. त्या डॉ. पवन पोडानी यांच्या कन्या आहेत. त्यांचे नाव सिव्हिल जज, न्याय दंडाधिकाऱ्यांच्या नियुक्ती यादीत 54व्या स्थानी आहे. ही एक मोठी कामगिरी असल्याचे त्यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.
बोडानी यांच्या काम करण्याला त्यांच्या समुदायातून विरोध होता. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. “लोक काय म्हणतात याला माझ्या कुटुंबाने काहीही महत्त्व दिले नाही आणि मला माझे लक्ष्य साधण्यास मदत केली,“ असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानातील हिंदू समुदायातून पहिले न्यायाधीश राणा भगवानदास हे होते. ते 1960 पासून 1968 पर्यंत पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश होते. याशिवाय त्यांनी 2005 ते 2007 पर्यंत कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.
गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) नेत्या कृष्णा कुमारी यांनी संसदेची निवडणूक जिंकली होती. पाकिस्तानातील हिंदू समुदायातून संसद सदस्य बनणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
पाकिस्तानात हिंदू समुदाय अल्पसंख्यांक आहे. देशातील एकूण लोकसंख्येत हिंदूंची संख्या केवळ दोन टक्के आहे.
