
मुंबई – नुकत्याच तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळविल्यानंतर मध्यप्रदेशसाठी अभिनेत्री करीना कपूर खानला भोपाळ लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी केली. करीनाने यावर प्रतिक्रिया देताना माझे संपूर्ण लक्ष चित्रपटांवर असून राजकारणावर नसल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक लढविण्यावर करिना कपूरची प्रतिक्रिया
तरुणाईमध्ये करीनाची प्रचंड क्रेझ असल्यामुळे जर तिला भोपाळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तर ही जागा काँग्रेसला जिंकणे सोपे होईल, असे भोपाळमधील काही काँग्रेस नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे करीनाला उमेदवारी द्या, असा आग्रह नगरसेवकांनी केला होता. याबाबतची माहिती करीनाला मिळताच, मी केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत असून निवडणूक लढवण्याच्या वृत्तात कुठलेही तथ्य नसून कोणत्याही पक्षाने माझ्याकडे निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली नसल्याचे तिने सांगितले.
