स्वप्नील जोशीच्या ‘मी पण सचिन’चा ट्रेलर रिलीज

swapnil-joshi
अभिनेता स्वप्नील जोशी आपल्या भेटीला एका सचिनचा खडतर प्रवास घेऊन येत आहे. स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’ अशी टॅगलाइन घेऊन नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. क्रिकेटला भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट यांचे अगदी दृढ नाते आहे. एका वेगळ्या रूपात हेच नाते ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘मी पण सचिन’ हा चित्रपट चित्रपटाच्या टॅगलाइनवरून एक सकारात्मक संदेश देणार हे नक्की. या चित्रपटातून स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नका, असा आशावादी विचार व्यक्त होत आहे.

‘मी पण सचिन’ या चित्रपटात एक सामान्य तरुण, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची मेहनत यांच्या जोरावर अशक्य वाटणारे त्याचे स्वप्न अप्रत्यक्षपणे कसे साकार करतो त्याची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. गावात राहणारा एक तरुण, लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याची असणारी लढाई, हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.

स्वप्नील ट्रेलरमध्ये तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन वेगवेगळ्या रूपात समोर येत आहे. ह्या चित्रपटांमध्ये अनेक बड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.