
माऊंट माउंगानुई – तब्बल ६९७ धावांचा पाऊस न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पडला. काल खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ विकेटच्या मोबदल्यात ३७१ धावा केल्या तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघाने ३२६ धावापर्यंत मजल मारली. श्रीलंकेला धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात ४५ धावांनी पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडने या विजयासह ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंड विरुध्द श्रीलंका एकदिवसीय सामन्यात धावांचा पाऊस
गेल्यावर्षी मार्चनंतर आपला पहिलाच सामना खेळणा-या न्यूझीलंडच्या सलामी फलंदाज मार्टिन गुप्टीलने १३८ धावा केल्यामुळे न्यूझीलंड ३७१ धावांचा डोंगर उभा करता आला. तसेच कर्णधार केन विलियम्सन ७६ आणि रॉस टेलर यांनी ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. गुप्टीलने केलेल्या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडने उभ्या केलेल्या या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ४९ षटकांमध्ये ३२६ धावा करु शकला. श्रीलंकेडून कुसल परेराने सर्वाधिक ८६ चेंडूत १०२ धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले चौथे शतक साजरे केले. परेराच्या या खेळीत १३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.
