
सिडनी :ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात चेंडू कुडतडण्या प्रकरणी दोषी आढळले होते. एका वर्षांची बंदी तत्कालीन कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांच्यावर घालण्यात आली, तर नऊ महिन्यांची शिक्षा बॅनक्रॉफ्टला झाली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बॅनक्रॉफ्टची शिक्षा संपणार आहे आणि बुधवारी या नऊ महिन्यांत प्रकरणावर भाष्य करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅनक्रॉफ्टने मौन सोडले. चेंडू कुडतडण्यासाठी आपल्याला वॉर्नरने प्रोत्साहीत केल्याचा दावा त्याने केला.
स्मिथने या प्रकरणी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्याने त्यात वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यात सुरु असलेल्या संवादाबद्दल आपल्याला माहिती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बॅनक्रॉफ्टने आज आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, उपकर्णधार वॉर्नरचा सल्ला मी ऐकला. चेंडू कुडतडण्यासाठी त्याने मला प्रोत्साहीत केले. त्याचे ऐकणे मला भाग होते, कारण संघात स्थान मला कायम टिकवायचे होते. त्या चुकीचा मला मोठा भुर्दंड भरावा लागला. मी केलेल्या कृत्याची जबाबदारी घेतो. हे मला टाळता आले असते, पण मी चुक केली, असेही तो म्हणाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेली नऊ महिन्यांची बंदी संपत असून तो 30 डिसेंबरला बिग बॅश लीगमधून पुनरागमन करणार आहे.
