
मुंबई : यूजर्सचा डेटा लीक प्रकरणात सोशल मीडियात अग्रगण्य असलेल्या फेसबुकला अब्जावधींचा तोटा सहन करावा लागला आहे. सोमवारी शेअर बाजारात फेसबुकचे शेअर्स सात टक्क्यांनी घसरले आणि याचा नुकसान फेसबुकला सोसावा लागला. ६.०६ अब्ज डॉलरचे (३९५ अब्ज रुपये) नुकसान शेअर घसरल्याने झाले.
फेसबुकला यूजर्सचा डेटा लीक प्रकरणात बसला मोठा दणका
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २०१७ साली झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकीत मदत करणाऱ्या ‘कॅम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीने जवळपास ५ कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. निवडणुकीत या चोरलेल्या माहितीचा वापर केला गेला, असाही आरोप आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिटनस्थित कॅम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी ‘फेसबुक इंक’कडे उत्तर मागितले आहे. एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
अमेरिकन शेअर बाजार सोमवारी उघडल्यानंतर फेसबुकच्या शेअर्सची जवळपास ५.२ टक्क्यांनी घसरण होत १७५ डॉलरवर आले. ही घसरण आणखी वाढत पुढे ७ टक्क्यांवर पोहोचली. नव्या वर्षात १२ जानेवारीनंतर ही पहिलीच मोठी घसरण असल्याची माहिती मिळते आहे. यामुळे फेसबुकच्या मार्केट कॅपिटलमध्ये जवळपास ३२ अब्ज डॉलरची घसरण होत, ५०० अब्ज डॉलरवर स्थिरावला.
