काळ्या पैशांच्या विरोधात कारवाईमुळे देशातून श्रीमंतांचे पलायन


काळ्या पैशांच्या विरोधात केंद्र सरकारने सुरू केलेल्या कारवाईमुळे देशातून अनेक श्रीमंतांनी पलायन केले आहेत. यातील सर्वाधिक श्रीमंतांनी तर गेल्या एक वर्षात पलायन केले आहे. याबाबतीत भारताने फ्रान्स आणि चीन या देशांना मागे टाकले आहे, असे मॉर्गन स्टॅनली इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या कंपनीने म्हटले आहे.

मॉर्गन स्टॅनली इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे इमर्जिंग मार्केटचे हेड तसेच चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजीस्ट रूचीर शर्मा यांनी एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार, 2014 पासून आतापर्यंत 23000 लक्षाधीश लोकांनी भारत सोडला आहे. यातील सर्वाधिक 7000 श्रीमंत गेल्या एका वर्षात भारतातून बाहेर गेले आहेत .

“वर्ष 2014 पासून 1.7 % लक्षाधीश लोकांनी सोडला आहे. फ्रांसमध्ये ही संख्या 1.3%, तर चीनमध्ये 1.1 टक्के एवढी आहे. काळ्यापैशाच्या विरोधात सरकारने सुरू केलेल्या कारवाईमुळे या लक्षाधीशांनी देशातून पलायन करणे स्वाभाविक मानले जाते. खूप अधिक नियंत्रण असले तर अशी परिस्थिती येते,” असे शर्मा यांनी इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्राला सांगितले.

भारतातून बाहेर जाणार्‍या लोकांसाठी ऑकलंड, दुबई, मॉन्ट्रियल तसेच टोरंटो या सर्वाधिक लोकप्रिय जागा असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

विशेष म्हणजे परदेशात घर असलेले परंतु तेथे स्थायिक झालेले अशा लोकांचा समावेश या लोकांमध्ये नाही. तसेच, लक्षाधीश म्हणजे ज्यांच्याकडे दहा लाख डॉलरपेक्षा अधिक संपत्ती आहे असे लोक होय. संपूर्ण जगात 2014 पासून आतापर्यंत दीड लाख लक्षाधीशांनी स्वतःचा देश सोडला आहे. यातील सर्वाधिक लक्षाधीश चीनमध्ये होते मात्र टक्केवारीच्या दृष्टीने त्यांचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे.

Leave a Comment