आयकर विभागाची बिटकॉईन खरेदीदारांना नोटीस


नवी दिल्ली – आता बिटकॉईन खरेदीदार आयकर विभागाच्या रडारवर आले असून आयकर विभागाने बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणा-या ३०० जणांकडून गुंतवलेल्या रकमेचा तपशील मागवला आहे. त्यांच्याकडे या पैशाच्या उत्पन्नाचा स्रोत कोणता याचीही विचारणा करण्यात आली आहे.

दरम्यान, बिटकॉईन या अभासी चलनातील गुंतवणुकीपासून दूर राहण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेनेही दिला आहे. बिटकॉईन खरेदी भविष्यात मोठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिटकॉईनच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार केला जात असून यामधील गुंतवणूक मुर्खपणाची ठरु शकते, असेही रिझर्व्ह बँकेने त्यांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

बिटकॉईनमधील गुंतवणुकीबाबत आणि वाढत्या किमतीबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही चिंता व्यक्त केली आहे. बिटकॉईनसह सर्व प्रकारची अभासी चलन बेकायदा असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले असून सरकार ते संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष (सीबीडीटी) सुशील चंद्रा यांनीही या गुंतवणुकीला सक्त विरोध दर्शवला आहे. या गुंतवणुकीवर मोठय़ा प्रमाणात कर आकारणी करण्याचेही सुतोवाच केले आहे.

आयकर विभागानेही या पार्श्वभूमीवर बिटकॉईन खरेदीदारांना आपल्या रडारवर आणले आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणा-यांना तातडीने नोटीस बजावण्यात आली असून यामध्ये पहिल्या यादीत ३०० जणांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीपासून मिळणा-या उत्पन्नाचीच माहिती आयकर विभागाने मागवली नसून त्यामध्ये केलेल्या गुंतवणूक रकमेचा तपशीलही मागवला आहे. या सर्वांच्या प्राप्तिकर परताव्याबाबतची फेरतपासणी केली जाणार आहे. उत्पन्नामध्ये बिटकॉईनमधील गुंतवणुकीचाही तपशील नोंदवून त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये काही चुकीचे अथवा बेकायदेशीर आढळल्यास संबंधितांवर फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. बिटकॉईन खरेदीबाबत गेल्यावर्षी सर्वच स्टॉक एक्स्चेंजमधून माहिती गोळा केली होती. त्यानंतरच या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Leave a Comment