
ग्रेनाड राजांनी १३ व्या शतकात बांधलेला स्पेनमधील ऐतिहासिक नासरीद महाल हे जगभरातल्या पर्यटकांचे स्पेनमधील मुख्य आकर्षण आहे. महालासमोर असलेले विशाल प्रांगण, त्याजवळील पूल व तेथेच असलेला पॅलेस ऑफ लायन्स ही या महालातील सर्वात भारून टाकणारी जागा म्हणावी लागेल. गेली कित्येक शतके उघडया जागेत असलेले हे सिंह पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता या सिहांना गंज चढू लागल्याने या मूर्ती पाचव्या कारलस संग्रहालयात म्हणजे म्युझिनो द बेलास येथे ठेवाव्यात असा विचार सुरू झाला आहे.
स्पेनचा ऐतिहासिक नासरीद महाल
या सुंदर महालासमोर असलेली भव्य मोकळी जागा महालाचे सौंदर्य अधिक उठावदार करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. महालाच्या भिंती व छतांवर अरबी भाषेतील पवित्र प्रार्थना कोरल्या गेल्या आहेत. महालच्या प्रत्येक खिडकीची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की त्यातून खालच्या हिरवळीचे व बगीच्याचे दर्शन झालेच पाहिजे. ही बाग अतिशय सुंदर आहे. पॅलेसमध्ये मूर्ती दरबारही आहे.
या पॅलेसमधील आणखी एक स्थळ पर्यटकांचे खूपच लाडके म्हणता येईल. येथे बागेजवळ असलेल्या पूलपाशी प्रचंड संख्येने मांजरे आहेत व ती इतकी धीट आहेत की पर्यटकांची कितीही गर्दी असली तरी ती बिलकुल घाबरत नाहीत. पर्यटक या मांजरांचेही पॅलेस इतकचे फोटो काढण्यात आनंद मानतात.
