
नवी दिल्ली – भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅपपैकी व्हॉट्सअॅप हे एक असून नेहमीच नवीनवीन फिचर्स व्हॉट्सअॅपने आणले आहेत. व्हॉट्सअॅप आता आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत असून आपल्याला या फिचरव्दारे एकमेकांना पैसे ट्रान्सफर करता येणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅपवर ही सुविधा या वर्षांअखेरपर्यंत उपलब्ध सुरु करणार असून यूपीआय म्हणजेच ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ सेवा ग्राहकांना वापरता येणार आहे. व्हॉट्सअॅपची यंत्रणा यासाठी काही बँका आणि एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी यूपीआय सपोर्टसाठी चर्चा करत आहे. यातील तांत्रिक गोष्टी सुरळीत झाल्या की ही सेवा व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
आता व्हॉट्सअॅपवरुनही करा पैसे ट्रान्सफर!
ऑनलाईन व्यवहाराला नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात असून व्हॉट्सअॅपकडून याचाच विचार करुन युजर्सना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याच्या प्रयत्न केला जात आहे. ग्राहक ही पेमेंटसेवा सुरु झाल्यानंतर एकमेकांना अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने पैसे पाठवू शकतील. त्यामुळे भारतात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटसअॅपवर ही सेवा कधी येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या व्यवहाराच्या सुरक्षिततेबाबत काय याबाबत अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
