रेल्वेच्या विविध सेवा आता एकाच अॅपवर


नवी दिल्ली – रेल्वेकडून या आठवड्यात एक नवे अॅप लॉन्च करण्यात येणार असून विविध सोयी सुविधांचा लाभ प्रवाशांना या अॅपमुळे घेता येणार आहे. हमालाची सेवा घेणे, एकाच अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना यापुढे विश्रांतीगृह बुक करणे, खाद्यपदार्थ ऑर्डर करणे या सर्व गोष्टी करता येणार आहेत.

रेल्वेच्या सॉफ्टवेअर विभागाची जबाबदारी असलेल्या ‘क्रिस’कडून रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी देणाऱ्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. सात कोटींचा खर्च यासाठी आला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. सध्या रेल्वेच्या विविध सेवांसाठी वेगवेगळे अॅप आहेत. विविध अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या विशिष्ट सेवा दिल्या जातात. पण बहुतांश अॅपमधून एकच सेवा देण्यात येते. रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी रेल्वेकडून नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वेच्या प्रत्येक सेवेसाठी मोबाईल वापरकर्त्यांना अॅप शोधून ते डाऊनलोड करावे लागतात. या नव्या अॅपची निर्मिती या सगळ्या अॅपला पर्याय देण्यासाठी आणि प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी पुरवण्यासाठी करण्यात आले असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा एकाच अॅपवर मिळणे गरजेचे होते. नव्या अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या सर्व सुविधांसोबतच टॅक्सी बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटदेखील बुकिंगदेखील करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Comment