चिलेमधील आश्चर्यकारक मार्बल केव्हज


चिले व अर्जेंटिना या देशांच्या सीमेवर असलेल्या भल्याप्रचंड करेरा लेक मधील चिलेच्या बाजूला असलेल्या मार्बल केव्हज हे निसर्गाने घडविलेले अद्भूत आश्चर्य मानले जाते. असे सांगतात की सहा हजार वर्षांपासून या संगमरवरी खडकांची पाण्याच्या प्रवाहामुळे झीज होऊन तेथे अद्भूत निळा रंग असलेल्या संगमरवरी गुहा तयार झाल्या आहेत. या सरोवरात हिमनद्यांचे पाणी येते व त्यांच्या प्रवाहामुळे या सरोवरातील खडकांची झीज होते. या पाण्यात खनिजांचे प्रमाण प्रचंड असल्याने पाणी निळेशार आहेच पण तोच रंग गुहांच्या आतील भागात असल्याने सूर्यप्रकाशाची किरणे या गुहांमधून अक्षरशः पाणी व खडकांचा अनोखा चमत्कार घडवितात. सूर्यकिरणांमुळे येथील पाणी दुधासारखे पण निळे दिसते.


या भागातील हवाही वेगळीच आहे. ती किमया साध्य केलीय येथील सायप्रस वृक्षांच्या दाटीने. येथे आलात की हवेत भरलेला एक हवाहवासा सुगंध तुमचे तनमन व्यापून टाकतो. हा सुगंध कँडीच्या सुगंधाची आठवण करून देतो. चिलेच्या दक्षिणेकडील हा भाग पँटागोनिया म्हणून ओळखला जातो. पुर्टे ट्रांक्विले असे नांव असलेल्या गावाजवळ या गुहा आहेत. येथे फक्त बोटीतून जाता येते. साधारण अर्धा तासाची ही राईड असते. पाणी व प्रकाशाचा हा खेळ अनुभवण्यासाठी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. येथील हवामान चांगलेच थंड आहे.

सुमारे १८५० चौरस मीटरच्या परिसरात हे सरोवर असून अँडीज पर्वतातील हिमनद्यांतून येथे पाणी येते. ट्राऊट व सामन माशांसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या सरोवराचा ९७० किमीचा भाग चिलेच्या हद्दीत येतो तर बाकीचा अर्जेंटिनाच्या हद्दीत येतो. या गुहांमधून फिरताना, संगमरवरी खांब, बोगदयांचा भूलभुलैय्या पाहता येतो.