एफ १६ विमाने भारतात बनविण्याचा मार्ग मोकळा


भारताची टाटा ग्रुप व अमेरिकन एरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्शल यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या करारानुसार अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ एफ १६ विमाने भारतात उत्पादित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यामध्ये होत असलेल्या पहिल्या भेटीपूर्वी आठवडाभर हा करार झाल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेतील हा सर्वाधिक मोठी गुंतवणूक असलेला करारही ठरला आहे. या कराराच्या वेळी टाटा ग्रुपचे रतन टाटा उपस्थित होते.

या करारानुसार लॉकहीड कंपनी भारतात ही विमाने उत्पादित करणे तसेच निर्यात करण्यासाठीचा प्रकल्प टेक्सासमधून हलवून येथे सुरू करणार असून त्यामुळे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच भारतीय हवाईदलाची मध्यम वजनाची, सिंगल इंजिनची लढाऊ विमानांची गरज पुरी होऊ शकेल असे सांगितले जात आहे. वास्तविक गेल्या ऑगस्टमध्येच लॉकहीडने मेक इन इंडियासाठी तयारी दर्शविली होती मात्र त्याचबरोबर ही विमाने भारतीय हवाईदलानेही खरेदी केली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेडमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या करारामुळे भारतात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईलच पण एफ १६ हे जगातले आत्तापर्यंतच्या लढाऊ विमानातले सर्वात यशस्वी विमान आहे. कंपनीने आत्तापर्यंत ४५०० विमाने तयार केली असून त्यातील ३२०० जगभरातील २६ देशात कार्यरत आहेत.

Leave a Comment