
नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने एक नवी ऑनलाईन सुविधा नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपलब्ध करुन दिली असून विभागाने यासाठी आपल्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर विशेष पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यावर क्लिक करुन आवश्यक माहिती भरल्यास लगेचच नागरिकाचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले जाईल.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड आता ऑनलाईन जोडा
ग्राहकाला या पर्यायावर क्लिक करुन आपला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डाची माहिती द्यावी लागेल. यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआयकडून या माहितीची पडताळणी केली जाईल. आधार कार्डावरील नाव आणि नागरिकाने वेबसाईटवर दिलेले नाव यात मोठी तफावत आढळल्यास वन टाईम पासवर्डची(ओटीपी) गरज भासेल. मोबाईल क्रमांक आणि ई-मेलद्वारे हा क्रमांक कळविला जाईल.
आपल्याला आधारकार्ड आणि पॅन कार्डला एकमेकांशी जोडणे प्राप्तिकर आणि प्राप्तिकर परतावा (टॅक्स रिटर्न) भरण्यासाठी देखील आवश्यक आहे. विनाअडथळा जोडणीसाठी पॅन आणि आधार कार्डावरील जन्मतारीख सारखीच असावी. त्याचप्रमाणे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्राप्तिकर खात्याच्या वेबसाईटवर लॉग-इन करण्याची गरज भासणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
येत्या १ जुलैपर्यंत देशातील सर्व नागरिकांना पॅन कार्ड आपल्या आधार कार्डासोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार असून ते कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अपात्र असेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे. देशातील प्राप्तिकर संकलन वाढवण्यासाठी आणि करचुकवेगिरी करणार्या लोकांवर लगाम लावण्यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत.
