जेवढे किमी चा प्रवास तेवढाच भरा टोल


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय टोल साठी नवे धोरण आखत असून लवकरच म्हणजे ऑगस्टपासूनच ते अमलात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या नियमांनुसार प्रवासी जेवढे किलोमीटरचा प्रवास करतील तेवढ्याच किलोमीटरसाठी त्यांना टोल भरावा लागणार आहे. यामुळे महामार्गांच्या जवळपास राहणार्‍यांना कमी टोल भरावा लागेल.

रस्ते वाहतूक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात या संदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले महामार्गांचा वापर करताना सध्या सगळीकडे ठराविक फिक्स चार्ज द्यावा लागतो. नॅशनल हायवे टोल नाक्यांवर नेहमीच प्रवासी व टोल घेणारे यांच्यात वादावादी होते, भांडणे होतात. शिवाय राजकीय दबाव असतात ते वेगळे. त्यामुळे आम्ही नवीन टोल धोरण तयार करत आहोत. यात कमी अंतराचा प्रवास असेल तर कमी टोल बसेल व जादा अंतराचा प्रवास असेल तर जादा टोल आकारला जाईल. यामुळे महामार्गांच्या जवळपास राहणार्‍यांचा विरोध कमी होईल कारण त्यांना कमी टोल बसेल.

जादा अंतरासाठी जादा टोल आकारल्यामुळे टोल नाक्यांचे नुकसान टळेल. सध्या साधारण ६० किमी अंतरावर टोल नाके आहेत. दरवर्षी टेाल चालकांकडून टोल वाढविण्याची मागणी केली जाते. सध्या सरासरी किमी साठी पाच रूपये पडतात. ऑगस्टमध्ये कार्यान्वित होत असलेल्या ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे वर नव्या धोरणांनुसार सर्वप्रथम टोल आकारणी सुरू केली जाणार आहे. हा हायवे १३५ किमी लांबीचा अ्रसून त्यानंतर हळूहळू अन्य टोल नाक्यांवरही नवीन धोरणानुसार टोल आकारणी केली जाईल.

Leave a Comment