
नवी दिल्ली – मोदी सरकारकडे ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील भारताची मातब्बर कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट आणि खासगी सेवा देणारी ओला या दोन कंपन्यांनी मदतीचा हात मागितला असून भारतीय कंपन्यांना अनुकूल धोरणे असावीत, असे आवाहन सरकारकडे फ्लिपकार्टचे सचिन बन्सल आणि ओलाच्या भाविश अगरवाल यांनी केले आहे. परकीय मालकीच्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी या कंपन्यांनी राष्ट्रवादाचा आधार घेतला आहे. या संदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
मोदी सरकारकडे ओला, फ्लिपकार्टने मागितला मदतीचा हाथ
चीनने १५ वर्षांपूर्वी जे केले, तेच आता आपल्या सरकारने करावे अशी आमची इच्छा आहे. तुमच्या भांडवलाची आम्हाला गरज आहे. मात्र तुमच्या कंपन्यांची आवश्यकता नाही, असा संदेश सरकारने जगाला द्यावा, असे आम्हाला वाटते, असे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी कार्नगे इंडिया ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटमध्ये म्हटले आहे.
सरकारने अमेरिकेच्या अॅमेझॉन आणि उबरसारख्या बलाढ्य कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी बन्सल आणि अगरवाल यांनी केली आहे. भांडवल आमच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र वस्तू आणि सेवांच्या किमतींच्या संघर्षामुळे अमेरिकी कंपन्यांसोबत स्पर्धा करताना नुकसान सहन करावे लागते, अशी व्यथा भारतीय कंपन्यांच्या संस्थापकांनी बोलून दाखवली.
आमच्या क्षेत्रांमध्ये नाविण्यपूर्ण सेवा हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामध्ये आम्ही अमेरिकन कंपन्यांना समर्थपणे टक्कर देत आहोत. मात्र मुख्य मुद्दा भांडवलाचा आहे. भांडवलाच्या कमतरतेमुळे मोठे नुकसान होते आहे, असे ओलाचे सीईओ अगरवाल यांनी म्हटले आहे.
