
बालासोर: संपूर्ण स्वदेशी बनावटीचे अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी- १’ची यशस्वी चाचणी ओदीशाच्या सागरी किनारपट्टीवर करण्यात आली. या क्षेपणास्त्राची ७०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे.
अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्र ‘अग्नी-१’ ची यशस्वी चाचणी
अब्दुल कलाम द्वीपसमूह येथील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रावरून सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अण्वस्त्र घेऊन जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्याची ग्वाही लष्कराने दिली आहे.
सामरिक बल कमांड अंतर्गत भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढविण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांतर्गत ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर केवळ ९ मिनिट आणि ३५ सेकंदात आपल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते.
या क्षेपणास्त्रात ‘नेविगेशन’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे ते ज्या टेहाळणी केंद्रात, इलेक्ट्रो-ऑप्टिक उपकरणावर अथवा युद्धनौकेवर बसविले असेल; तेथून लक्ष्य भेदेपर्यंत त्याच्यावर नजर ठेऊ शकणार आहे.
