पाकिस्तानची निर्मिती अतार्किक

pakistan
भारताचे विभाजन झाले आणि आताचा पाकिस्तान अस्तित्वात आले. पण हा नवा देश हा जगातले एक आश्‍चर्य वाटावे असा होता. या देशाचे दोन भाग होते. एक भाग म्हणजे आताचा पाकिस्तान आणि दुसरा भाग म्हणजे आताचा बांगला देश. हे दोन एकाच देशाचे दोन भाग होते आणि ते एकमेकांपासून जवळपास दोन हजार मैल लांब होते. त्यांचा भूभाग सलग नव्हता. या दोघांच्या मध्ये भारत देश होता. असला देश एक अखंड देश म्हणून टिकणे शक्यच नव्हते. फार तर २५ वर्षे असा हा देश टिकला आणि १९७२ साली पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन त्याचा बांगला देश झाला. आता जो देश पाकिस्तान म्हणून अस्तित्वात आहे तो तरी धड आहे का ? त्याचेही उत्तर नकारार्थीच आहे. केवळ मुस्लिम जादा आहेत म्हणून पाकिस्तान हा नवा मुस्लिम देेश अस्तित्वात आला असे काही या देशाचे झाले नाही. आताच्या पाकिस्तानात चार प्रांत आहेत. पंजाब,सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत. स्वातंत्र्यापूर्वी हे सारे भाग भारताचेच भाग होेते पण नंतर ते पाकिस्तानचे भाग झाले.

यातल्या बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत या दोन प्रांतात मुस्लिम जादा आहेत आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी तशीच स्थिती होती पण या दोन प्रांतातल्या मुस्लिमांनी कधीही पाकिस्तान निर्मितीची मागणी केलेली नव्हती. पाकिस्तान निर्माण झाला तेव्हाही या दोन प्रदेशातल्या लोेकांनी त्याचा आनंद साजरा केला नाही. वायव्य सरहद्द प्रांताचे नेते खान अब्दुल गफारखान यांनी तर पाकिस्तान निर्मितीच्या मागणीला विरोध केला होता आणि आपल्याला पाकिस्तान नाही तर भारतात रहायला आवडेल असे म्हटले होते. फाळणीच्या वेळी पंजाब आणि सिंध प्रांतात मोठे स्थलांतर झाले आणि मोठा रक्तपात झाला पण या दोन प्रांतात काही अपवाद वगळता हिंसक प्रकार घडले नाहीत. मग या भागातल्या जनतेची पाकिस्नात निर्मितीची मागणी नसतानाही त्यांना बळजबरीनेेच पाकिस्तानात टाकण्यात आले. जेएनयूतल्या ज्या आझादी वीरांना काश्मीर खोर्‍यातल्या मुस्लिमांचा पुळका येतो त्यांना वायव्य सरहद्द प्रांतातल्या आणि बलुचिस्तानातल्या मुस्लिमांचा पुळका का येत नाही ? त्यांची आझादीची मागणी काश्मीरपुरतीच का मर्यादित रहाते ? या देशद्रोही लोकांचे प्रेम ना मुस्लिमांवर आहे ना पाकिस्तानवर आहे. त्यांना केवळ मोदी सरकारला डिवचण्यासाठी हा उपद्व्याप करायचा आहे आणि असले काहीही अतार्किक मुद्दे उपस्थित करून भारतात प्रक्षोभ निर्माण मोदी सरकारला बदनाम करायचे आहे. अन्यथा असे धंदे या लोकांनी कधी केले नसते.

भारताने १९४८ च्या युद्धात काश्मीर युद्धात स्वत: होऊन युद्धविराम जाहीर केला आणि काश्मीरमध्ये जनतमाचा कौल घेण्याचा प्रस्ताव मांडला पण आता भारत सरकार हे सार्वमत घेण्याची टाळाटाळ करीत आहे असा या विकृत लोकांचा आरोप आहे. या बाबतीत त्यांचे आणि पाकिस्तानचे एकमत आहे. कारण पाकिस्तानचे युनोतले प्रतिनिधीही असे हे सार्वमताचे खुसपट काढत असतात. पण या सार्वमताच्या संबधात काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. पहिली बाब म्हणजे सार्वमताची सूचना मांडताना, पाकव्याप्त काश्मीर भारतातल्या काश्मीरमध्ये विलीन झाला पाहिजे आणि पूर्ण शांतता नांदली पाहिजे अशा शांततेच्या वातावरणातच सार्वमत घेतले जाणार होते. पण अजूनही एक तृतियांश काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या भागावरचा पाकिस्तानचा ताबा आणि काश्मीरचा ताबा यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. पाकिस्तानने ताब्यात घेतलेला काश्मीरचा भाग बळाने आणि लष्करी कारवाई करून ताब्यात ठेवलेला आहे. तर भारताताले काश्मीर खोरे तिथल्या जनतेच्या आणि राजाच्या मर्जीने भारतात विलीन झालेले आहे. त्याला भारत सरकारने स्वतंत्र दर्जा देऊन आणि खास अधिकार देऊन आपल्यात ठेवले आहे. पण जेएनयुतले हे कथित आझादी प्रेमी पाकव्याप्त काश्मीरवरील पाकिस्तानच्या ताब्यावर एक शब्दही बोलत नाहीत.

हाच ढोंगीपणा अन्यही काही बाबतीत आढळतो. पाकिस्तानात आता असलेले लाहोर हे शहर आता तिथल्या पंजाब प्रांताची राजधानी आहे. हे शहर भारत – पाक सीमेपासून जेमतेम ४० किलो मीटरवर आहे. या शहरात फाळणीच्या वेळी मुस्लिमांची संख्या केवळ ३० टक्के होती आणि उर्वरित ७० टक्के संख्या हिंदू आणि शीख यांची होती. लोकसंख्येची ही विभागणी आणि लाहोरचे सरहद्दी पासूनचे अंतर पाहिले तर लाहोर भारतात असायला हवे होते पण, या नव्या दोन देशांच्या सीमा ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने लाहोर पाकिस्तानला देण्याची शिफारस केली. हा भारतावर आणि तिथल्या हिंदूंवर अन्याय होता. पण भारत सरकारनेही आयोगाची शिफारस मान्य केली. लाहोर भारताला दिल्यास प.पाकिस्तानात एकही मोठे शहर राहणार नव्हते हा आयोगाचा युक्तिवादही भारत सरकारने मान्य केला पण काश्मीरच्या कथित आझादीचे टिमके वाजवणार्‍या लोकांनी आजवर कधीही लाहोरबाबत झालेल्या अन्यायावर चकार शब्दही काढला नाही. या सार्‍या प्रकरणात आणखी एक विकृती आहे. काश्मीरला भारतात बळजबरीने ठेवून घेतले आहे हे वादासाठी मान्य केले तरीही ही बळजबरी नेहरू, गांधी आणि पटेल यांनी केली आहे. म्हणजे हे अाझादीवाले खर्‍या अर्थाने आझादीची मागणी करून नेहरूंचा धिक्कार करीत आहेत पण राहुल गांधी त्यांना पाठींबा देत आहेत. यात राहुल गांधी यांचा बालीशपणा आहे.

Leave a Comment