
अॅमॅझॉन डॉट कॉम इंक ने मालाची डिलिव्हरी वेगाने करण्यासाठी २० बोईंग ७६७ फ्रेटर विमाने लीजवर घेण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेने अॅमेझॉन स्वतःचे एअर डिलिव्हरी नेटवर्क स्थापन करणारी जगातली पहिली ऑनलाईन कंपनी बनली आहे. बुधवारी एअर ट्रान्स सर्व्हिस ग्रुपकडून ही माहिती दिली गेली आहे.
अॅमेझॉन वेगवान डिलिव्हरीसाठी बोईंगचा करणार वापर
कंपनीकडे दररोज येत असलेल्या लाखो ऑर्डर्सची डिलिव्हरी वेळात व जलद गतीने करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना सध्या मिळत असलेल्या मालाच्या डिलीव्हरीपेक्षा कमी वेळात डिलिव्हरी देण्याचा कंपनीचा प्रयत्न असून त्यामुळे ग्राहक संख्या वाढण्यास मदत होणार आहे. तसेच व्यवसायावर नियंत्रण ठेवणेही सोपे होणार आहे. सध्या कंपनी ड्रोनच्या सहाय्याने डिलिव्हरी करत आहे मात्र त्याला मर्यादा आहेत. विमानातून डिलिव्हरी माल पाठविला गेला तर अधिक संख्येने व दूरपर्यंतच्या ठिकाणीही माल कमी वेळात पोहोचविणे शक्य होणार आहे. यासाठी कंपनीने बोईंग सेवा ५ ते ७ वर्षाच्या मुदतीसाठी लीजवर घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
