
कोल्हापूर : राज्यातील साखर उत्पादन दुष्काळामुळे घटणार असून त्यातच केंद्र सरकारने निर्यातीसाठी सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत घाऊक बाजारात प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील मागणी व उत्पादन पाहता साखर तीन हजारांवर स्थिरावेल, असा अंदाज असून किरकोळ बाजारात साखर ७ ते ८ रुपयांनी महाग होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात साखर झाली कडू
साखरेच्या दराने यंदाचा साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी आतापर्यंतचा नीचांक गाठला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला साखरेच्या दरात थोडी थोडी वाढ होत गेली. त्यात हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने एकूण उत्पादनाच्या १२ टक्के निर्यात कोटा दिल्याने त्याचा परिणामही बाजारपेठेवर झाला. त्यात दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट झाल्याने परिणामी साखर उत्पादन कमी होणार आहे. गत वर्षी राज्यात ९२९ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यावर्षी कसेतरी ७०० लाख टन गाळप होईल, अशी परिस्थिती आहे.
१५ दिवसांपूर्वी राज्यातील साखर कारखान्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेऊन निर्यातीबाबत कारखान्यांना इशारा दिला होता. देशात ४० लाख टन साखर निर्यात होणार आहे. त्यापैकी नऊ लाख टनच साखर निर्यात झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे चार लाख टन साखर निर्यात झाल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून घाऊक बाजारात सध्या २९७५ रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विक्री होत आहे.
