
या आठवड्यात भारतीय रूपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २८ महिन्यातील नीचांकी पातळी गाठली असल्याचे दिसत असतानाच रशियाच्या रूबलने भारतीय रूपयालाही घसरणीबाबत मागे टाकले असल्याचेही दिसून येत आहे.रूबल मधील घसरणीने आत्तापर्यंतची सर्व रेकॉर्ड तोडली असून तो डॉलरच्या तुलनेत ८०.१ वर आला आहे. रूबलने घरसणीतील २०१४ सालचे आपले रेकॉर्डही मोडले आहे.
रशियन रूबलची ऐतिहासिक घसरण
रूबलच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या १२ वर्षात नीचांकी पातळीवर आलेल्या तेलाच्या किमती हे मुख्य कारण आहे. यामुळे रशियाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे. युरोच्या तुलनेत रूबल ८७.६ वर आला आहे. रशियाच्या एकूण महसूलातील निम्मा महसूल त्यांना नैसर्गिक वायू आणि तेलाच्या व्यापारातून मिळतो. मात्र युक्रेनमधील बंडखोरांना समर्थन देण्याच्या रशियाच्या भूमिकेमुळे पश्चिम देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत व त्यामुळे रशियाला परदेशातून उधार घेणेही अवघड बनले आहे. यामुळे रशियावरील आर्थिक संकट अधिक गहीरे होत चालल्याचे जाणकारांचे मत आहे.
