
अहमदाबाद – अनेक परीक्षांत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळविता येते. परीक्षा या सर्वसामान्यपणे अभ्यासक्रमावरुनच घेण्यात येतात आणि रात्र अन् दिवस एक करत विद्यार्थी अभ्यास करुन उत्तीर्ण होतात. त्यासाठी वर्ग आणि वय याचे बंधनही घालण्यात येते. याला अपवाद ठरला आहे अहमदाबादचा १० वर्षाचा मुलगा. त्याने हे सर्वच बंधन तोडून नवा विक्रम केला आहे.
१० व्या वर्षीच ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ झाला रोनील
जावा (JAVA) या सॉफ्टवेअरसाठी अमेरिकेच्या ऑर्कल विद्यापीठाने परीक्षा घेतली. भल्या-भल्यांना या परीक्षेत मागे टाकत अवघ्या १० वर्षीय रोनील शाहने या परीक्षेत यश संपादन केले आहे. ही परीक्षा २ तास ५६ मिनिटाची होती. मात्र रोनील ते १८ मिनिटातच संपवली.
या कामगिरीमुळे सर्वात लहान वयात ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ बनण्याचा मान रोनीलने मिळविला आहे. रोनील अहमदाबादेतील यूरोस्कूलमध्ये शिकत आहे. रोनीलला वयाच्या ४ वर्षापासून संगणक हातळण्याची सवय आहे. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने अॅनिमेशन, कोरल ड्रॉ, सी आणि सी प्लस प्लस शिकायला सुरुवात केली.
रोनीलच्या यशाचे कौतुक करत त्याच्या वडिलांनी गर्व वाटत असल्याचे सांगितले. पुढील वर्षी मुंबईत रॉबोटीक परीक्षा होत असून त्यासाठी रोनीलकडून तयारी करुन घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
