कंपन्यांना सावध राहण्याचा सल्ला; मोदी विश्वासघातकी !

modi1
वॉशिंग्टन : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या डिजिटल इंडिया मोहिमेच्या प्रचारासाठी सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सिलिकॉन व्हॅलीला जाणार आहेत; परंतु याचदरम्यान अमेरिकी विद्यापीठातील दक्षिण आशियाविषयक १२४ तज्ञांनी एक वक्तव्य जारी करत सिलिकॉन व्हॅलीच्या कंपन्यांना मोदी सरकारपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २७ सप्टेंबरच्या सिलिकॉन व्हॅली भेटीला १२४ अमेरिकी प्राध्यापकांनी विरोध केला आहे. त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. विरोध करणा-या या अमेरिकी प्राध्यापकांनी भारतातील शैक्षणिक स्वायतत्ता धोक्यात आल्याचेही म्हटले आहे.

हे प्राध्यापक विविध अमेरिकन विद्यापीठांतील दक्षिण आशियातील घडामोडींचे जाणकार म्हणून ओळखले जातात. या प्राध्यापकांनी मोदी यांच्याविरोधात मानवाधिकारंचे उल्लंघन, व्यक्तिगत स्वातंत्र्याची पायमल्ली आणि गुजरात दंगलीसारखे मुद्दे उचलले आहेत. त्यांनी सिलिकॉन व्हॅलीताल कंपन्यांना मोदी सरकारसोबत व्यवसाय करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

कंपन्याना पाठवलेल्या या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणा-या या प्राध्यापकांत प्रा. नंदिनी भट्टाचार्य, प्रा. तिथी भट्टाचार्य, अर्जुन अप्पादुरई, थॉमस ब्लॉम, राधिका बालाकृष्णन यांच्यासारख्या शंभर मोठ्या नावांचा समावेश आहे.