मंगळावर राहण्याचा ‘नासा’ने सुरू केला सराव

nasa
वॉशिंग्टन- मंगळावर वास्तव्य करण्यासाठी अमेरिकन अवकाश संस्था ‘नासा’ने सराव सुरू केला असून त्यासाठी ‘नासा’च्या सहा जणांच्या चमूने वर्षभरासाठी एका निर्जन बेटावर मुक्काम ठोकला आहे. याठिकाणी त्यांना ताजी हवा, अन्न या गोष्टींपासून दूर राहून मंगळावर जसे वातावरण आहे, तशा वातावरणात राहण्याचा सराव होणार असून मंगळावर मानव राहू शकतो का? याचा अभ्यास करण्यासाठी ही पूर्वतयारी असल्याचे ‘नासा’च्या सूत्रांनी सांगितले आहे.

हा चमू हवाई बेटांवरील एका मृत ज्वालामुखीजवळ राहत असून त्याठिकाणी उभारलेल्या एका खास तंबूमध्ये त्यांचा मुक्काम आहे. सुमारे वर्षभर हा चमू येथे राहणार असून मंगळावर राहताना काय काय अडचणी येऊ शकतात? आणि त्यातून कसा मार्ग काढावा? याचा सराव येथे होणार असल्याचे समजते. या चमूमध्ये शास्त्रज्ञ, वैमानिक, अभियंता आणि पत्रकार अशा सहा जणांचा समावेश असून अशाप्रकारे मृत ज्वालामुखीच्या बाजूला राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Leave a Comment