
स्वाद भरे, शक्ती भरे पारले जी बिस्कीटांची जादू ओसरू लागल्याचे संकेत मिळू लागले असून गेल्या ७६ वर्षात प्रथमच या उत्पादनाला ब्रिटानियाच्या टायगर बिस्कीटांनी टक्कर देत पारले जीवर कुरघोडी केली असल्याचे दिसून आले आहे. नुस्ली वाडियांच्या ब्रिटानिया कंपनीच्या टायगर ब्राँडने पारलेच्या पारले जीला विक्रीत प्रथमच मागे टाकले आहे. रिसर्च फर्म निल्सनच्या अहवालानुसार या वर्षी एप्रिल पर्यंत ब्रिटानियाच्या टायगरचा मार्केट शेअर २८ टक्के झाला असून पारले जीचा शेअर २७.५ झाला आहे.
पारले जी ला टायगर ची टक्कर
पारलेचा भारतातील इतिहास मोठा रोचक आहे.१९२९ साली मुंबईच्या विलेपार्ले भागात पारले प्रॉडक्टसचा छोटा कारखाना सुरू झाला.त्यावेळी तेथे टॉफी, चॉकलेट बनविली जात होती तर बिस्कीटे बनविण्याची सुरवात १९३९ साली झाली. ही बिस्कीटे ग्लुको बिस्कीटे नावाने बाजारात आणली गेली व या उत्पादनाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. १९४७ साली या बिस्कीट पुड्याच्या कव्हरवर एका लहान मुलीचा फोटो झळकला व आजही हाच फोटो कायम आहे. या मुलीची ओळख पटविण्यासाठी अनेक नांवे घेतली गेली मात्र अखेरी पार्लेनेच नागपूरच्या नीरू देशपांडे या मुलीचा हे हाताने काढलेले चित्र असल्याचे जाहीर केले. आज नीरू देशपांडे ७६ वर्षांच्या आहेत.
इतक्या वर्षांच्या व्यवसायात पारले जीच्या किमती केवळ दोन ते तीन वेळाच वाढल्या तर त्यांची जाहिरातही दोन ते तीन वेळाच बदलली गेली. सुरवातील पारले ग्लुको असलेल्या या बिस्कीटांचे १९८० साली पारले जी असे नामकरण केले गेले. पारलेच्या कारखान्यात या बिस्कीटांचे रोज ४० कोटी पॅक बनतात. खेड्यापासून शहरांपर्यंत कुठेही ही बिस्कीटे एकाच किमतीला मिळतात. पारले जी कॅनडा, युरोप, ब्रिटन, अमेरिका अशा अनेक देशांतही उपलब्ध आहेत.
