अजमेर दर्ग्यावर ओबामांची चादर

ajmer
अजमेर शरीफ दर्ग्याच्या ८०३ वा उरूस आज सुरू होत असून त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाठविलेली लाल रंगाची आणि दाट एम्ब्रॉयडरीने सजविलेली चादर आज सकाळी ११ वाजता दर्ग्यावर चढविली जाणार आहे. ओबामांनी ही चादर अमन का पैगाम म्हणून म्हणजे जागतिक शांततेसाठी पाठविली असून अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी ती मोईनुद्दीन यांचे २७ वे वंशज चिश्ती फौंडेशनचे हाजी सैयद सलमान चिश्ती यांच्याकडे कांही दिवसांपूर्वीच सोपविली होती.

अजमेर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे सूफी परंपरेतील संत होते. गेली ८०० वर्षांहून अधिक काळ त्यांच्या अजमेर येथील दर्ग्यात चादर चढविण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. पूर्वी राजे, महाराजे, सत्ताधीश, सम्राट येत असत आता विविध देशांचे प्रमुख, नेते पुढारी येथे चादर चढविण्यासाठी येतात. पाकिस्तान, श्रीलंका या देशांकडूनही चादरी पाठविल्या जातात मात्र अमेरिका सरकारकडून प्रथमच अशी चादर पाठविली गेली आहे असे सैय्यद चिश्ती यांनी सांगितले. हा उरूस १ आठवडा सुरू राहणार आहे.