विजय मल्या यांच्या खासगी विमानाची विक्री

vijay
विमानतळ प्राधिकरणाचे भाडे थकविल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या किंगफिशर विमान कंपनीचे मालक आणि उद्योजक विजय मल्या यांच्या नऊ सीटर खासगी विमानाची विक्री करण्याचा निर्णय मुंबई विमानतळ प्राधिकरणाने घेतला असल्याचे वृत्त आहे. तीस वर्षांपूर्वीचे हे जुने एचएस १२५ – ७०० बी नऊ सीटर कापोरेट प्लेन आहे. त्याची नोंदणी शॉ वॉलेस कोलकाता यांच्या नावावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे विमान यापूर्वी ओबेरॉय ग्रुपकडे होते. मल्या यांच्या यूबी ग्रूपने शॉ वॉलेसचे २००५ साली अधिग्रहण केले होते. ही कंपनी आता युनायटेड स्पिरीटसचा भाग आहे. विमानाची विक्री करण्यासंदर्भातली जाहिरात पेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात आहे त्या स्थितीत विमान विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मल्या यांनी विमानतळाचे भाडे थकविल्याप्रकरणी हा निर्णय घेतला गेला असला तरी न्यायालयाच्या आदेशाशिवाय अशी विक्री करता येत नाही असेही सांगितले जात आहे.

डीजीसीएच्या रेकॉर्डनुसार विजय मल्लया यांच्याकडे अजून किंगफिशर ५ एटीआर, एक एअरबस अे ३१९, एक खासगी जेट आणि मल्लया उडवित असलेली दोन इसी १५५ बी हेलिकॉप्टर त्यांच्या नावावर नोंदविलेली आहेत.