लंडनमधील ओल्ड वॉर ऑफिस हिंदूजा बंधूंकडून खरेदी

london
लंडन – ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारत म्हणून ओळखल्या जाणार्‍या ओल्ड वॉर कार्यालयाची हिंदुजा समुहाने स्पेन कंपनी बरोबरच्या सहकार्य करारात खरेदी केली आहे. ही प्रसिद्ध वास्तू पहिल्या महायुद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे कार्यालय म्हणून वापरात होती. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडूनही हा सौदा झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला गेला आहे.

हिंदूजा समुहाचे प्रमुख श्रीचंद आणि गोपीचंद हिदूजा यांनी ही इमारत खरेदी केल्याचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुजा समुहाने ओब्रास्कान हार्ट लेन डेसारोल्स या कंपनीबरोबर सहकार्य करार करून ही इमारत २५० वर्षांच्या लीजने खरेदी केली आहे. ब्रिटीश सांसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ असणार्‍या या इमारतीत ११०० खोल्या आहेत. १७ मजल्यांची ही इमारत ५ लाख ८० हजार चौरस मीटर परिघात पसरलेली आहे.

या इमारतीचा नवीन पद्धतीने विकास करण्यात येणार असून येथे पंचतारांकित हॉटेल तसेच खासगी समारंभासाठी हॉल बांधण्यात येणार असल्याचे हिदूजा समुहाकडून सांगण्यात आले आहे.