
मॅक्सव्हिल : मॅक्सव्हिल ह्या फिलीप ह्युजच्या जन्मगावी आज भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्यासह संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ ह्युजच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. त्याचबरोबर या अंत्यसंस्काराला त्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्र असे जवळपास अडीच हजार लोक उपस्थित होते. फिलच्या अंत्यसंस्कारावेळी पॉलबेअरर असलेल्या मायकल क्लार्कने फिलच्या आठवणींना उजाळा दिला तेव्हा तर हॉलमधील उपस्थितांना अश्रू आवरणेही कठीण झाले होते.
क्रिकेट जगताने दिला फिल ह्युजला अखेरचा निरोप
आकर्षक पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या चॉकलेटी रंगाच्या कॉफिनमध्ये चिरनिद्रा घेणाऱ्या फिल ह्युजेसच्या शेजारी त्याची आवडती बॅट, तसेच बॅगी ग्रीन कॅप, त्याच्या डोमेस्टीक टीमची कॅप आणि त्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा गणवेषही ठेवण्यात आला होता. या अंत्यसंस्काराला ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अबॉटही हजर होते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, आणि रवी शास्त्री यांनीही फिलला आदरांजली वाहिली.
फिलीप ह्युजच्या स्मरणार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची ६२ नंबरची जर्सी कायमस्वरूपी त्याच्या नावावर करून त्याला श्रद्धांजली वाहिली.
