
ठाणे – शिवजयंती म्हणजेच १९ फेब्रुवारीचा मुहूर्त मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजनासाठी निश्चित करण्यात आला असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे निमंत्रण पाठवले असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी याबाबतची माहिती दिली.
शिवजयंतीला शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
याबाबत सविस्तर माहिती देताना मेटे म्हणाले अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाचे भूमीपूजन १९ फेब्रुवारी २०१५ रोजी गिरगाव चौपाटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने मात्र अजूनही तारखेबद्दल निश्चित माहिती दिलेली नाही. पण गेली अनेक वर्ष रखडलेला अरबी समुद्रातल्या महाराजांच्या स्मारकाचे काम यानिमित्ताने दोन ते तीन महिन्यात सुरू होईल, अशी चिन्हं मात्र दिसू लागली आहेत. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयी एक विशेष बैठक घेऊन लवकरच भूमीपूजन करणार असल्याची माहिती दिली होती.
