लवकरच मुंबईवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

cctv
मुंबई : मुंबईवर सहावर्षापूर्वी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहराच्या सुरक्षेची आठवण प्रशासनाला झाली आहे. मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरु झाल्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईतील अनेक संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी तब्बल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.

सरकारी दिरंगाईमुळे एल अँड टी या कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटाची प्रक्रिया रखडली होती. सुमारे १ हजार १०० कोटींचा हा प्रकल्प निविदा प्रक्रियेमुळे रखडला होता. पण या निविदेवर अंतिम वाटाघाटी करण्याची जबाबदारी एका उपसमितीला देण्यात आली आहे.

याआधी तीन कंपन्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने निविदा प्रकिया रखडली होती. तर एकदा राज्याच्या तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी असमर्थता दर्शवल्याने प्रकल्प बारगळण्याची भीती निर्माण झाली होती. पण आता मार्गातले सर्व अडथळे दूर होऊन मुंबई अधिक सुरक्षित होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पामुळे मुंबईतील किनारपट्टी परिसर, महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांचा परिसर, चौक-गर्दीचे रस्ते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. त्याद्वारे संपूर्ण मुंबईतील हालचालींवर पोलिसांची करडी नजर असेल. संशयास्पद हालचाली दिसल्यास लागलीच पोलिस सतर्क होतील आणि लागलीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे त्यांना शक्य होईल. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment