
मुंबई – मनसेच्या बालेकिल्ल्याला हादरा देणारे मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांचे बंड आता थंड पडले असून सर्व मनसेच्या नगरसेवकांनी गीतेंच्या सुरात सूर मिसळण्यास नकार देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे गीते एकाकी पडले आहे. तसेच राज यांनी आपला नाशिक दौराच रद्द केल्यामुळे गीतेंना तलवार म्यान करावे लागले आहे.
वसंत गीतेंचे बंड थंड
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर मनसेत सोमवारी अचानक राजीनामा सत्र सुरू झाले. नाशिकच्या बालेकिल्ल्यात प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गीतेंनी राजीनामा देऊ केला. त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्षांसह १५० पदाधिकार्यांनी आपले राजीनामे दिले. आपल्या बाजूने सर्व नगरसेवक आहेत अशी वल्गना करत वसंत गीतेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. एवढंच नाहीतर मनसेचे नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही सुरू झाली. सोमवारी रात्रीपर्यंत मनसेच्या नगरसेवकांमध्ये काथ्याकूट सुरू होता. पण अखेरीस सर्व नगरसेवकांनी राज यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
