
दुसर्या महायुद्धांच्या काळात डांसामुळे होणार्या मलेरियाचा फार मोठा त्रास होता. या विकाराने अनेक लोक मरत असत. त्यावर औषधे शोधली गेली पण वरचेवर ती निष्प्रभ होत गेली. जगातल्या सगळ्या औषधांचे आणि लसींचे असेच होत असते. त्या शोधल्यानंतरच्या काही वर्षात प्रभावी असतात पण त्या ज्या कीटकांच्या विरोधात असतात. ते कीटक आपल्या शरीरात त्या औषधाविषयीची प्रतिकार शक्ती वाढवत असतात. त्यामुळे कालांतराने ती औषधे आणि लसी निरुपयोगी ठरायला लागतात आणि साधारण २० ते ३० वर्षांनी नव्या लसी आणि औषधे शोधण्याचे काम करावे लागते. डासांपासून होणार्या अनेक आजारांच्या लसी शोधण्यात आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर औषधेही नाहीत आणि ते आजार मुळात होऊच नयेत म्हणून काही लसीही उपलब्ध नाहीत. मानव हा फार प्रगत प्राणी आहे आणि त्याने अनेक रोगांवर मात केली आहे असे म्हटले जाते पण त्याला आता डोळ्यांना न दिसू शकणारे हे लहान जिवाणू आणि विषाणूही आटोक्यात आणता येत नाहीत. म्हणून हिवतापसदृश्य अशा सार्या आजारांचे आव्हान अजून कायम आहे. उलट त्या आव्हानाने माणूस त्रस्त झाला आहे.
डासांचे आव्हान
भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात मुंबईत डेंग्यू विकाराने आजारी पडणारांचे प्रमाण वाढले आहे. हा आजार फारसा गंभीर नाही कारण तो जीवघेणा नाही. त्याची लागण डांसामुळे होते पण तो काही संसर्गजन्य किंवा साथीचा रोग नाही. तरी शेवटी एखाद्या विशिष्ट आजाराने आजारी पडणारांची संख्या वाढत चालली की चिंता वाढणे अटळ असते. मुंबई तर गर्दीचे शहर आहे. तिथे रोज लाखो लोक नव्याने येतात आणि तेवढयाच संख्येने लोक या शहराच्या बाहेरही जातात. भारतात आता डेंग्यूने आजारी पडणारांचे काही आकडे जाहीर होत आहेत आणि त्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे पण जाहीर होणारे आकडे काही खरे नाहीत. डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्याच्या बाबतीत सुद्धा सरकारी आणि सामाजिक पातळीवर उदासीनता दिसून येते. म्हणून सरकारी आणि सत्य आकडे यात फरक असतो. एक धक्कादायक माहिती अशी बाहेर आली की, सरकार सांगते त्याप्रमाणे डेंग्यूची बाधा होणार्यांची सरासरी संख्या सुमारे ३० पटीने जास्त आहे. भारत हा डेंग्यूचा प्रचार करणारा सर्वात मोठा देश आहे. जगात दरवर्षी साधारण ३९ कोटी लोकांना डेंग्यूची बाधा होते. हा आकडा शंभर देशांच्या पाहणीतून प्राप्त झाला आहे. या ३९ कोटींपैकी ६० लाख लोक एकट्या भारतातले असतात. हे पाहिले म्हणजें या संकटाचे परिणाम काय होणार याबाबतीत चिंता वाटणार नाही तर काय होईल ?
या विकारांचे मूळ आपल्या विशिष्ट राहणीमानात, गजबजलेल्या वस्त्यांमध्ये आणि नागरी सुविधांच्या अभावात दडलेले आहे. ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत मुंबई शहरावर आणि अन्यही भागावरचे हे संकट कायम राहणार आहे. गोरेगाव, सांताक्रूज आणि बांद्रा (वेस्ट) या भागांमधून गेल्या एका महिन्यात ३०० रुग्णांची नोंद झाली आहे. या भागातील होली फॅमिली आणि भाभा रुग्णालयात सरासरी दररोज ८ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे. इतरही उच्चभ्रू वस्यांतून १५ दिवसांत दररोज १० डेंग्यू रुग्ण मुंबईच्या विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. या विकारामध्ये मृत्यूमुखी पडणार्यांचे प्रमाण फार कमी असते. सध्या त्याच्या लक्षणावर इलाज करण्याच्या सोयी चांगल्याच उपलब्ध आहेत. परंतु या विकाराला कोणी मृत्युमुखी पडत नाही म्हणून त्याच्याविषयी फार चर्चा होत नाही. प्रत्यक्षात मात्र डेंगीमुळे माणूस फार खिळून राहतो. त्याला प्रचंड अशक्तपणा येतो आणि त्याची कार्यक्षमता पुढचे काही महिने तरी कमी झालेली दिसते. अशी व्यक्ती कष्ट करून कमावणारी असेल तर तिचे फार हाल होतात. कारण त्याचे उत्पन्न त्या काळात घटते आणि खर्च मात्र प्रचंड होत राहतो.
हे सगळे आकडे श्रीमंत वस्त्यातले आहेत आणि जमा झालेले आकडे महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे आहेत. प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयात जाऊन इलाज घेणार्यांची संख्या यापेक्षा कितीतरी मोठी आहे, पण त्यांची गणती कोठेही होत नाही. त्यामुळेच सरकारतर्फे सांगितले जाणारे आकडे हे खरे नसतात. सरकार सांगते त्यापेक्षा किती तरी मोठ्या संख्येने रुग्ण डेंग्यूने बाधित झालेले असतात. या आजाराचा प्रसार रोखणे जसे सरकारी यंत्रणेवर अवलंबून असते तसेच ते नागरिकांवरही अवलंबून असते. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन म्हणून पाळा, घरात कोठेही पाणी साचू देऊ नका, निरुपयोगी वस्तूंमध्ये पाणी साचले तर त्या वस्तू फेकून द्या आदि उपाययोजना करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे, परंतु लोकही फार जागरूक नाहीत. त्यामुळे मुंबईत महापालिकेने शेवटी जनतेला निर्वाणीचा इशारा दिला आहेे. ज्यांच्या घरामध्ये डेंग्यूचा प्रसार करणार्या डासांच्या अळ्या सापडतील त्या लोकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल असे प्रशासनाने बजावले आहे. एचढेच नाही तर अनेक लोकांवर कारवाई करायलाही सुरूवात केली आहे. जनतेनेही जागरूक रहायला हवे. काही सोपे उपाय योजिल्यास या आजारांना आपल्यापासून दूर ठेवता येते.
