
मुंबई – शिवसेनेविणाच भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले असून भाजप आणि सेनेच्या पुन्हा युती होण्याचे घोडे मंत्रिपदावरून अडले आहे. १४ मंत्रिपदाचा प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिला असून, यात ७ कॅबिनेट व ७ राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. याचबरोबर किमान दोन मंत्र्यांना फडणवीस यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यात शपथ द्यावी, अशी मागणी शिवसेनेने भाजपकडे केली होती पण सेनेची ही मागणी भाजपने धुडकावून लावली आहे.
शपथविधी सोहळ्यापासून दूरच राहणार शिवसेना!
शिवसेनेने भाजपच्या या ताठर भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असून विरोधात बसण्याची तयारी केली आहे. तसेच उद्या होणा-या फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेचा एकही आमदार अथवा पदाधिकारी हजर राहणार नाही. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून एक जणाला पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
