
नागपूर – गुरुवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दिवाळीनिमित्त ही भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चांशी याच्याशी संबंध लावण्यात येत होता.
गडकरींनी दिले मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्टीकरण
अखेर गडकरींनी आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. गडकरी म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसून, माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही. राज्यात पुन्हा माझी येण्याची इच्छा नसल्याचे सांगताना मला दुःख होत आहे. दिल्लीमध्ये मी खूश आहे. महाराष्ट्रात येण्याची माझी कोणतीही योजना नाही. फडणवीस यांना मीच राजकारणात आणल्याने आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही.
