
मुंबई – महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्ने उरी बाळगून नवा महाराष्ट्र घडवायला निघालेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यताच धोक्यात आली असून आता त्यांचा पक्ष केवळ नोंदणीकृत पक्ष म्हणून उरणार आहे. सध्या मनसे हा प्रादेशिक पक्षांच्या यादीत आहे.
‘मनसे’चे इंजिन कारशेडमध्ये?
२००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आल्यामुळे ह्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा व निवडणुकीसाठी ‘रेल्वे इंजिन’ हे चिन्ह ही देण्यात आले होते. मात्र लोकसभा व या विधानसभा निवडणुकांत मनसेची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्यांचा हा दर्जा अडचणीत आला आहे.
राज्य पक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी पक्षाला राज्यात सहा टक्के मते हवीत, तसेच किमान दोन आमदार निवडून यायला हवेत किंवा लोकसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात सहा टक्के मते मिळून एक खासदार निवडून यायला हवा. या दोन्ही अटी मनसे पूर्ण करीत नाही. कारण त्यांचा एकही खासदार निवडून आलेला नाही. तसेच विधानसभेतही त्यांना अवघी एक जागा व ३.१ टक्के मते मिळाल्यामुळे निवडणूक आयोग त्यांचा राज्य पक्षाचा दर्जा काढून घेईल. असे झाल्यास मनसे इतर छोट्या पक्षांप्रमाणे केवळ नोंदणीकृत पक्ष म्हणून उरेल.
