निवडणूकीनंतर अटकसत्राला सुरुवात, राष्ट्रवादीच्या आमदारासह १०० कार्यकर्ते ताब्यात

ncp
परभणी – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्याप्रकरणी पाथरी पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार बाबाजानी दुरानी यांना अटक केली आहे. दुरानी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १०० कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले आहे. बाबाजानी यांच्या अटकेनंतर पाथरीमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. मतदानाच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर झालेल्या वादामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता तसेच अन्य काही कार्यकर्तेही जखमी झाले होते. याप्रकरणी काँग्रेस शहराध्यक्षाने तक्रार दाखल केल्यानंतर पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी आमदार दुरानी यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांना अटक केली आहे.