
पोलादपूर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कामात कार्यरत असलेल्या एका लिपिकाचे हृद्यविकाराच्या झटक्याने आज निधन झाले आहे. योगेश नथुराम भिसे असे मृत इसमाचे नाव असून, ते पोलादपूर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात लिपिक पदावर कार्यरत होते. राज्याचे मुख्य निवडणूक अधिका-यांनी जिल्हा प्रशासनाकडे भिसे यांच्या वारसदारांना १० लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी केली होती आणि ती तात्काळ मंजूरदेखील झाल्याचे सूत्रांकडून समजते. लवकरच भिसे यांच्या वारसदारांना ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार, निवडणुकीचे कर्तव्य बजावताना कर्मचा-याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास १० लाख मदत देण्याची तरतूद आहे.
