सेबीच्या डीएलएफवरील बंदीचा फटका गुंतवणूकदारांना

dlf
मुंबई – बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या डीएलएफवर आणि कंपनीच्या सहा अधिकाऱ्यांवर सेबीने देशातील भांडवली बाजारात तीन वर्षे व्यवहार करण्याची बंदी घातली. सेबीच्या या निर्णयानंतर भांडवली बाजारात डीएलएफच्या समभागांमध्ये २८ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली. त्यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना ५,५७८ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असून विदेशी गुंतवणूकदारांना १५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत डीएलएफमधील त्यांची गुंतवणूक एप्रिल ते जून या तिमाहीतील १९.८८ टक्क्यांवरून १९.७५ टक्क्यांपर्यंत कमी केली होती. विदेशी गुंतवणूकदारांनी जानेवारी ते मार्च या तिमाहीपासून डीएलएफच्या समभागांची विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे. यावेळी विदेशी गुंतवणूकदारांची कंपनीतील हिस्सेदारी १९.९० टक्के इतकी होती. डीएलएफच्या समभागांमध्ये शुक्रवारी २८ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. त्यामुळे प्रमोटर्स शेअर मूल्यात ५,५७८ कोटी रुपयांची घट नोंदविण्यात आली. तसेच समभागांच्या घसरणीमुळे कंपनीचे बाजारमूल्य देखील ७,४३८.६७ कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीत सध्या ३३४ विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार असून त्यांच्याकडे कंपनीचे ३५ कोटी पेक्षा अधिक समभाग आहेत. तर एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करणार्‍या छोट्या गुंतवणूकदारांची संख्या ४,३४,३२६ इतकी आहे. या गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असून एक लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार्‍या ६९ गुंतवणूकदारांना ४८ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.