दिर्घकाळ चालेल इसिसविरोधातील मोहिम – ओबामा

barack-obama
वॉशिंग्टन – इस्लामिक स्टेट अतिरेकी संघटनेविरोधात सुरू केलेले अभियान दिर्घकाळ चालेल, असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मेरीलॅंड येथे अधिका-यांशी झालेल्या बैठकीनंतर ओबामा म्हणाले की, ही एक दिर्घकालीन मोहिम असून, तात्काळ याचा काही परिणाम दिसेल, अशी आम्हालाही अपेक्षा नाही. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, अतिरेक्यांनी इराक आणि सिरीयाच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला आहे. अतिरेकी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षित लष्करी आव्हान निर्माण करत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. इराक आणि सिरीयात अमेरिकेद्वारे वायुहल्ले होत असतानादेखील अतिरेकी नव्या परिसरावर ताबा मिळवत आहेत. अशा वेळेतच लष्करी अधिकारी, व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यात बैठक झाली. इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी पश्चिमी इराकमधील लष्कराच्या एका प्रशिक्षण शिबिरावर ताबा मिळवला आहे. तसेच बगदादमध्येदेखील स्फोट घडवून आणले आहेत. त्यामुळे इराकी सेना प्रत्युत्तर देण्यात सक्षम नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी म्हटले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यातील रणनितीवर आम्ही अंमलबजावणी करत आहोत. मात्र त्याच्या परिणामांवरुन असे स्पष्ट होत आहे की, आमची रणनिती यशस्वी ठरत आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment