इंडिगो खरेदी करणार २५० नवीन एअरबस ए-३२० विमाने

indigo
मुंबई – देशातील खासगी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने आज २५० एअरबस ए-३२० नियो विमाने खरेदीच्या करारावर स्वाक्षरी केली. एखाद्या कंपनीने एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमानांची मागणी नोंदविण्याची ही पहिलीच घटना आहे. या करारावर कंपनीचे सह संस्थापक राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया यांनी स्वाक्षरी केली. यासंदर्भात माहिती देताना इंडिगोचे अध्यक्ष आदित्य घोष यांनी सांगितले की, नव्या विमानांच्या मदतीने कंपनी कमी दरात अधिकाधिक प्रवाशांना सुविधाजनक सेवा देऊ शकणार आहे. त्याचबरोबरीने अधिकाधिक रोजगार देखील उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले. घोष पुढे म्हणाले की, या नव्या करारामुळे देश-विदेशात स्वस्त दरातील हवाई सेवेच्या विकासाप्रती इंडिगोची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यापूर्वी इंडिगोने २८० एअरबस विमानाची मागणी नोंदविली होती. एअरबसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फब्रिस ब्रेगियर यांनी सांगितले की, ए-३२० नियो या विमानांनी जागतिक बाजारावर वर्चस्व निर्माण केले आहे आणि या करारामुळे जागतिक बाजारात ए-३२० नियो हे विमान सर्वाधिक सक्रीय आणि पसंतीचे आहे हे देखील सिद्ध झाले आहे. ए-३२० नियो वापराच्या पहिल्या दिवसापासूनच इंधनामध्ये १५ टक्क्यांपर्यंत बचत करते. आतापर्यंत या प्रकाराच्या ११,००० विमानांची मागणी नोंदविण्यात आली आहे, ज्यांपैकी ६२०० विमानांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे, असे देखील त्यांनी सांगितले. इंडिगो कंपनीची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून देशातंर्गत बाजारपेठेतील ३२ टक्के हिस्सा कंपनीने पटकाविला आहे. कंपनीतर्फे दररोज ५३० विमानसेवा चालविल्या जातात.

Leave a Comment