अफगाणिस्तानातील अतिरेकी हल्ल्यात सहा पोलीस शहिद

terrorist
काबूल – अफगाणिस्तानमधील लोगार प्रांतातील एका पोलीस चौकीवर आज तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सहा पोलीस कर्मचारी शहिद झाल्याचे सूत्रांकडून समजते. जिल्हा प्रमुख मोहम्मद रहिम अमीन यांनी सांगितले की, तालिबानी अतिरेक्यांच्या गटाने आज सकाळी बराक जिल्ह्यातील एका पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात सहा पोलीस कर्मचारी शहिद झाले आहेत. प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते दीन मोहम्मद दारविश यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, या हल्ल्याचा तपास सुरू आहे. गृहमंत्री उमर दौदजाई यांनी आज सुरक्षा रक्षकांच्या बैठकीत सांगितले की, योग्य हत्यारांच्या कमतरतेमुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थेचे नुकसान होत आहे. अतिरेकी पोलिसांवर अद्ययावत हत्यारांच्या मदतीने हल्ले करतात, असे त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ पोलीस शहिद झाले होते.