
पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि पक्षांतर झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तीन प्रचारसभा घेऊन त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप व स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पक्षाने जगताप व लांडगे यांना सर्वकाही देऊन देखील ते सोडून गेले. याला कृतघ्नपणा म्हणतात, अशा शब्दांत पवार यांनी दोघांवर आगपाखड केली. यावेळी आपण कोणालाही माफ करणार नाही. विरोधात काम केल्याची किंमत मतदान झाल्यानंतर मोजावीच लागेल, अशी जाहीर दमबाजी देखील त्यांनी यावेळी केली. अजित पवार यांनी चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी सांगवी, तर भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार विलास लांडे यांच्या प्रचारासाठी भोसरी येथे प्रचारसभा घेतली. अजितदादांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आमदार लक्ष्मण जगताप हे चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवत आहेत. तर स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे हे भोसरीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. यावेळी अजित पवार यांनी दोघांवर थेट हल्ला चढवला. पिंपरी-चिंचवडमधील मतदारांनी दहशतीला, दादागिरीला घाबरू नये. शहराचा विकास गतिमान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनाच विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
