मोदी नाही घेणार तुळजाभवानीचे दर्शन !

modi2
उस्मानाबाद – तुळजापूर येथे प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी येत आहेत. ते हेलिकॉप्टरने येणार असून भाषणानंतर नांदेड जिल्ह्यातील लोह्याकडे प्रयाण करतील. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव ते कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी तुळजापुरात सभा घेतल्यामुळे अखेरच्या टप्प्यात मोदींना तुळजापुरात सभा घ्यावी लागली. या सभेची तयारी आठ दिवसांपासून सुरू होती. अन्य राज्यांतून आलेल्या पोलिस अधिका-यांनी हेलिपॅडसह पंतप्रधान मोदींच्या सभेचे नियोजन आखून दिले. पंतप्रधान कार्यालयाच्या नियोजनाप्रमाणे मोदी यांच्या दौ-यामध्ये कमालीची शिस्त आहे. तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडलगत मोकळ्या मैदानावर होत असलेल्या सभेच्या ठिकाणापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर हेलिपॅड असून, पंढरपूर येथील सभेनंतर हेलिकॉप्टरने मोदी यांचे १२.४५ वाजता आगमन होणार आहे. अंदाजे ४५ मिनिटांच्या भाषणानंतर ते लगेच हेलिकॉप्टरने लोहा येथील सभेसाठी रवाना होतील.