पोरेड्डीवार बंधूंनी दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा

congress
गडचिरोली – विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असताना गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात वेगवान उलथापालथ होत असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि त्यांचे बंधू प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. अरविंद सावकार व प्रकाश सावकार यांचे वडील नामदेवराव पोरेड्डीवार हे १९५२ ते १९५७ या कालावधीत आमदार होते. अरविंद सावकार पोरेड्डीवार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार हे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखण्यात येत होते. पक्षात अनेक महत्त्वाची पदेही त्यांनी भूषविली. परंतु त्यांनी आज दोघांनीही काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. हे आरक्षण काँग्रेसनेच कमी केले आणि ते पूर्ववत करण्याचे आश्वासन देऊनही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे अरविंद सावकार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. दरम्यान, आजवर आम्ही अनेक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु पक्षाने आपली कदर केली नाही. त्यामुळे राजीनाम्याचा निर्णय घेतला. आपण कुठल्या पक्षात जायचे याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार असल्याचे प्रकाश पोरेड्डीवार यांनी सांगितले