सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या उमेदवारासाठी मोदींची सभा

modi
पुणे- भ्रष्टाचाराचे काँग्रेस पक्षावर आरोप करून केंद्रात सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी गुन्हेगारी व भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रचार करताना दिसत असून तब्बल १२ गुन्हे दाखल असलेले व एका खटल्यात तुरुंगवासासह एका वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झालेले भाजपचे राहुरीतील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी मोदींनी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सभा घेतली.

पंतप्रधान मोदींनीच अनेक खटले नावावर असलेल्या व सक्तमजुरी झालेल्या कर्डिले यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून चार दिवसापूर्वी मोदींनी धुळे येथे भाजपचे उमेदवार व तेलगी घोटाळयाप्रकरणी आरोप झालेले अनिल गोटेंसाठी प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी टीका झाली असतानाही भाजपने व पंतप्रधानांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी उमेदवाराच्या प्रचार सभेला जाण्यास पसंती दिली आहे. यावरून भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे हे स्पष्ट होत आहे. तसेच सत्ता आणण्यासाठी आकडेच उपयोगाचे असतात यावर भाजपचा अढळ विश्वास बसू लागला आहे. नैतिकच्या गप्पा मारत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपचा तीन-चार महिन्यांतच दुसरा रंग दाखवू लागला आहे.

दरम्यान, कर्डिले यांच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोदींना काळे झेंडे दाखवले. पंतप्रधानांनी गुन्हेगारी व्यक्तींसाठी प्रचारसभा घेऊन आपली प्रतिमा मलिन करू नये अन्यथा काळे झेंडे दाखवू असा इशारा शिवसेनेनेने दिला होता.