
मुंबई – अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या मुहूर्ताचा पुरेपूर व्यावसायिक लाभ उचलण्यासाठी ऍपल आणि सॅमसंग या स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये जाहिरात युद्ध सुरु झाले आहे. या दोन्ही कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन एकाच वेळी बाजारात येत आहेत. ऍपलच्या आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस या स्मार्टफोन्सला सॅमसंगच्या गॅलेक्सी अल्फा आणि नोट ४ या मोबाइलशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जाहिरातीद्वारे आकर्षित करण्यासाठी या दोन्ही कंपन्या सज्ज झाल्या आहेत.
ऍपल आणि सॅमसंगमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर जाहिरात युद्ध !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या नवीन स्मार्टफोन्सच्या जाहिरातींसाठी किमान २०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. सॅमसंग त्यांच्या दोन्ही उत्पादनांसाठी जाहिरातींवर १०० ते १२० कोटी रुपये खर्च करण्याची योजना बनवत आहे. तर ऍपल देखील रिलायन्स आणि एअरटेल या दोन टेलिकॉम भागीदारांसोबत ७० ते ८० कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करणार आहे. भारतीय बाजारातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींवर आतापर्यंत खर्च करण्यात येणारी ही सर्वाधिक रक्कम आहे, अशी माहिती बाजारातील सूत्रांनी दिली.
